Nisatte Kshan निसटते क्षण

क्षण कितीही सुवर्णासारखे असले तरी क्षणच ते निसटतातच ओंजळ रिकामी ठेऊन…आठवणीची कुपी मात्र तशीच राहते अन्तर्मनात…
क्षणाक्षणांनी आयुष्य सरकते, जणू एक एक क्षण निसटत जातो, आयुष्याचा…

बालपनाचा काळ किती सुखाचा असतो ना आमच्या आयुष्यात, मनात असते फक्त एक निष्पाप भावना, ना कसली चिंता, ना कसली पर्वा…बालपण नकळत निसटून जाते, उरतात त्या रम्य आठवणी, मात्र एक बालक प्रत्येक मनात राहतो तसाच जागृत शेवटपर्यंत…

प्रेम एक मधुर भावना…प्रत्येक मनात रुजलेली, उमललेली…कधी ती भावना फूलते, फळते तर कधी तशीच राहते अपूर्ण…अनंत काळापर्यंत…क्षण जातात निसटून अलगद…वेडे मन मात्र राहते गुंतून तसेच अंतिम श्वासापर्यंत…

आई आणि वडील असतात शिल्पकार जणू आमच्या जीवनाचे, आम्हाला घडवत जातात, आमचे पालन पोषण करतात… आम्हाला हवे-नको बघत बघत स्वतः च्या इच्छा-आकाक्षांना घालतात मुरड… आमच्या डोळ्यांत बघतात ती उद्याची उज्वल स्वप्ने…त्यांनी आमच्यावर केलेल्या प्रेम आणि वात्सल्याचे ते क्षण ही अलगद जातात निसटून…आई- वडिलांपासून  कधी दूर जातांना मनात उमटते निसटलेल्या क्षणांची भावना…

आमच्या शालेय आणि कॉलेज जीवनात कितीतरी शिक्षक भेटतात आम्हाला…काही मात्र खूपच जवळचे वाटतात…का कुणास ठाऊक आमची काळजी करतात…कधी चुकलो तर प्रेमाने समज काढतात… आम्हाला प्रेरणा देतात…त्यांच्यापासून दूर होण्याची वेळ येते मात्र तेव्हा डोळ्यांच्या कडा नकळत पाणवतात…ह्र्दयाची वीण तुटावी तसाच काहीसा भास होतो…तो दुरावा असह्य वाटतो… ते सहवासाचे क्षण मात्र निसटून गेलेले असतात…

शाळा -कॉलेजात असताना मित्रांसोबत केलेली मौज, मस्ती, जगलेले आनंददायी, वेदनादायी क्षण, घालवलेले अन मनात कायम एक घर करून राहिलेले मित्र-मैत्रिणी… शिक्षण संपून कधी मित्रांचा निरोप घेण्याची वेळ येते…इतके वर्ष कशी संपून गेली ते समजतच नाही… क्षण जातात निसटून…

आपल्या सोबत काम करणारा एखादा सहकारी बदली होऊन दुरच्या गावी जातो किंवा आपल्याला हवेहवेसे वाटणारे आपले वरिष्ठ साहेब बदलून दुसरीकडे जातात… त्यांच्या सोबत काम करताना किती छान वाटायचं ना… मनात काही निसटून गेल्याची भावना उगीच सतावत राहते…मनाला उगीच अस्वस्थ करते…

असे अनंत सुखदुःखाचे क्षण येतात आमच्या आयुष्यात कधी ते तसेच राहावेत असे वाटते, मात्र क्षण आम्हाला पकडून ठेवता येत नाही… ते निसटतातच मनाचा गाभारा रिकामा करून.. मनाची पोकळी रिकामी करून..त्या सुखद क्षणांना आठवतांता डोळ्यांत कधी हळुवार अश्रू येतात तर कधी ओठांवर नुसते स्मितहास्य… आयुष्य म्हणजे दूसरे काय असेल तरी अशाच निसटलेल्या क्षणांची एक जोडलेली साखळी… कुठली कडी हवीहवीसी तर कुठली नकोसी वाटणारी.. जीवनगाडी मात्र पुढे सरकतच असते निसटत्या क्षणांना मागे सोडून…

कधी एखाद्या संध्याकाळी हातात चहाचा कप घेऊन आठवत राहतात यासारख्या कितीतरी गोष्टी…नकळत चहा संपून जातो…हातात रिकामा कप तसाच धरुन नजर दूर कुठेतरी शोधत राहते निसटलेल्या क्षणांना…

– ©राजेश खाकरे
मो.7875438494
rajesh.khakre@gmail.com

You May Also Like

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *