Man Vadhay Vadhay Lyrics

मन वढाय वढाय
उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर ..!

मन पाखरू पाखरू
याची काय सांगू मात ?
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात ..!

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन ?
उंडारलं उंडारलं
जसं वारा वहादनं ..!

मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे, इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर ..!

मन एव्हडं एव्हडं
जसा खाकसंचा दाना
मन केवढं केवढं ?
आभायात बी मायेना ..!

मन मोकाट मोकाट
याच्या ठाई ठाई वाटा
जशा वाऱ्यानं चालल्या
पान्यावऱ्हल्या रे लाटा ..!

मन चपय चपय
त्याले नही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धरतीवर ..!

देवा, कसं देलं मन
आसं नही दुनियांत
आसा कसा रे तू योगी
काय तुझी करामत ..!

देवा आसं कसं मन
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तूले
असं सपनं पडलं ..!

कवी : बहिणाबाई


View All Old Marathi Kavita

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *