Lakshmichi Paule Marathi Katha

लहानशी गोष्ट आहे. रात्री साडेनऊचा सुमार, एक पोरगा एका चपलेच्या दुकानात शिरतो. गावाकडचा टिपीकल. हा नक्की मार्केटिंगवाला असणार, तसाच  होता तो, बोलण्यात गावाकडचा लहेजा तरीही काॅन्फीडन्ट. बावीस-तेवीस वर्षांचा असेल. दुकानदाराच लक्ष पहिल्यांदा पायाकडे जातं. त्याच्या पायात लेदरचे शूज व्यवस्थित पाॅलीश केलेले..!

दुकानदार – काय सेवा करू..?

मुलगा – माझ्या आईला चप्पल हवीय. टिकाऊ पाहिजे..!

दुकानदार – त्या आल्या आहेत का..? त्यांच्या पायाचं माप..?

मुलाने आपलं वाॅलेट बाहेर काढलं. त्यात चार घड्या केलेला एक कागद होता. त्या कागदावर पेनानं आऊटलाईन काढलेली दोन पावलं होती.

दुकानदार – अरे, मला मापाचा नंबर चालला असता..!

तसा तो मुलगा एकदम बांध फुटल्यासारखं बोलता झाला ‘काय माप सांगू साहेब..? माझ्या आयनं जिंदगीभर पायात कदी चप्पलच घातली नाय. आई ऊसतोड कामगार होती. काट्याकुट्यात कुटं बी जात्ये. अनवानी ढोरावानी मेहनत केली. मला शिकवलं. मी शिकलो अन् नोकरीला लागलो. आज पहिला पगार झालायं. दिवाळीला गावाकडं चाललोय. आईला काय नेऊ..? हा सवालच पैदा होत नाही. माझे किती वर्षांच स्वप्न होते. पहिल्या पगारातून आईला चपला घेऊन जायच्या.’

दुकानदारान चांगल्या टिकाऊ चपला दाखवल्या. आठशे रूपये किंमत होती. त्या पाहून मुलाने ‘चालतंय की..!,’ असे सांगितले. त्याची तयारी त्याने केली होती.

दुकानदाराने सहज विचारले, ‘किती पगार आहे रे तुला..?

मुलगा – सध्याच्याला बारा हजार आहे. राहणे, खाणे धरून सात-आठ हजार खर्च होतात. दोन तीन- हजार आईला धाडतो..!

दुकानदार – अरे मग आठशे रूपये जरा जास्त होतात.

मुलाने दुकानदाराला मध्येच रोखत असुद्या म्हणून सांगितले.दुकानदाराने बाॅक्स पॅक केला. मुलाने त्याला पैसे दिले आणि तो आनंदात बाहेर निघाला. एवढी महागाची भेट किंमत करताच येणार नव्हती त्या चपलांची…!

पण दुकानदाराच्या मनात नेमके काय आले कुणास ठाऊक. मुलाला, जरा थांब असे सांगितले. दुकानदाराने अजून एक बाॅक्स मुलाच्या हातात दिला.

दुकानदार म्हणाला, ‘ही चप्पल आईला तुझ्या या भावाकडून गिफ्ट असे सांग. पहिली खराब झाली की दुसरी वापरायची. तुझ्या आईला सांग आता अनवाणी फिरायचं नाही आणि नाही म्हणायचं नाही.’

दुकानदाराचे आणि त्या मुलाचे असे दोघांचेही डोळे भरून आले. ‘काय नाव तुझ्या आईचं..?,’ असे  दुकानदाराने विचारलं तर तो लक्ष्मी असे ऊत्तरला.

दुकानदार लगेचच बोलला, ‘माझा नमस्कार सांग त्यांना आणि एक वस्तू देशील मला..? पावलांची आऊटलाईन काढलेला तो कागद हवाय मला…!

तो मुलगा कागद दुकानदाराच्या हातात ठेऊन आनंदात निघून गेला. तो घडीदार कागद दुकानदाराने  दुकानाच्या देव्हाऱ्यात ठेवला. दुकानातील देव्हाऱ्यातला तो कागद दुकानदाराच्या लेकीनं बघितला आणि तिनं विचारलं, ‘काय आहे हे बाबा..!

दुकानदार दिर्घ श्वास घेऊन आपल्या लेकीला बोलला लक्ष्मीची पावलं’ आहेत बेटा…!. एका सच्च्या भक्ताने काढली आहेत. त्यानं बरकत येते धंद्याला..!. लेकीनं, दुकानदाराने आणि सगळ्यांनीच मनोभावे त्या पावलांना नमस्कार केला..!

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *