Marathi LekhMarathi Stories

Lagna Mhanje Nemaka Kay?…

लग्न…लग्न म्हणजे नेमकं काय?

लग्न म्हणजे नेमकं काय?

दोन अनोळखी जीव, प्राक्तनाने एकमेकांना भेटलेले एकमेकांचा जीव होऊन बसणे म्हणजे लग्न… लग्न म्हणजे माझे हसवणे, तुझे हसणे… तू रुसने मी मनवने… मी स्वप्नी बघणे, तू सत्यात उतरवणे… मी पाहणे आणि तू दिसणे…

लग्न म्हणजे, मी रोज नवनवीन पदार्थ बनवणे आणि तुझ मन भरून खाणे,कौतुक करणे पण मी आजारी असली की मात्र तू बनवलेल्या अळणी खिचडीतही मला पंचपक्वानाचा आस्वाद मिळणे! लग्न म्हणजे दोन जणांनी एकत्र येऊन चार भिंतींना घर बनवणे, जरी चुकला एक तर दुसऱ्याने त्या चुकांवर पांघरूण घालणे!

लग्न म्हणजे , ‘मी आहे म्हणून टिकले, दुसरी असती तर कधीच सोडून गेली असती’ पासून तर ‘तू आहेस म्हणून मी आहे’ असे म्हणणे! लग्न म्हणजे सुसाट सुटलेल्या तुझ्या बाईकच्या बॅक सीट वरून एक हाथ तुझ्या खांद्यावर येणे आणि अचानक तू बाईक चा स्पीड कमी करणे!.

लग्न म्हणजे घरी कुणीतरी वाट बघतय याची जाणीव असणे, वाफाळत्या चहाची गच्चीत बसून मज्जा घेताना कुणीतरी सोबत असणे! लग्न म्हणजे तू म्हणावे ‘तु बस आज मी चहा बनवून पाजतो’ आणि चहा कुठे, साखर कुठे, आलं कुठे हे सांगण्यापेक्षा मीच चहा बनवणे सोपे असं मला वाटणे!.

लग्न म्हणजे मी तुला जोमात म्हणावे ‘चल आज तुझ्यासाठी शॉपिंग करू’ आणि येताना ४ साड्या तूच मला घेऊन देणे लग्न म्हणजे माझे ‘और तिखा भैय्या और तिखा’ करत पाणीपुरी खाणे आणि मला आवडते म्हणून तू पण एखादी खाऊन तुझ्या कानातून धूर निघणे.

लग्न म्हणजे तुला आवडते म्हणून खास तुझ्यासाठी मी कधीतरी साडी नेसणे आणि तुलाच साडीच्या मीऱ्या सावरायला लावणे! लग्न म्हणजे, उत्तर माहीत असतानाही माझे रोज तुला ‘जेवायला काय बनवू’ विचारणे आणि तुझे रोजच्याचप्रमाणे ‘बनव काहीपण’ म्हणणे!

लग्न म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणाऱ्या मला मात्र तू चिडलास की भीती वाटणे, आणि मी चिडले की तू फालतू जोक करून मला हसवणे! लग्न म्हणजे तुझ्या आजारपणात मी खंबीरपणे उभी राहणे पण माझ्या आजारपणात एरवी पर्वतासारख्या कणखर तूझे लहान मुलासारखे रडणे!

लग्न म्हणजे स्वतः पेक्षाही जास्त तुझ्यावर विश्वास असणे आणि तुझा त्या विश्वासाला कधीच तडा न जाऊ देणे! लग्न म्हणजे आरशातही नाही दिसणार असं माझं प्रतिबिंब तुझ्या डोळ्यात दिसणे आणि आजवर जेवढं मी स्वतः ला नाही ओळखू शकले तेवढं तू मला ओळखणे…

लग्न म्हणजे तू मला अगदी रडवेली होईपर्यंत चिडवणे पण कुणी दुखावलं मला की हळूच तुझे माझ्या डोळ्यातलं पाणी टिपणे! लग्न म्हणजे “जा तू माहेरी, आराम कर, मी करेन मॅनेज थोडे दिवस” म्हणून दुसऱ्याच दिवशी फोन करून तुझे कधी येतेय विचारणे…

लग्न म्हणजे दवाखान्यात माझ्या प्रसूती वेदनांचा आवाज ऐकून तुझे रडणे! लग्न म्हणजे मी कितीही म्हंटलं की “अरे तू झोप तसही बाळ तुझ्याकडुन नाही झोपणार” तरीही तू माझ्यासोबत रात्रभर जागणे!

लग्न, लग्न म्हणजे नेमकं काय हो, भांडण, रुसवे, फुगवे, आनंद, सहजीवन,सहवास हे तर आहेच पण रक्ताच्या नात्यांपेक्षाही नवरा बायकोच्या नात्याचं पारडं जड आहे! थोडं आंबट, थोडं गोड, थोडं कडू, थोडं तिखट असं हे नातं… पण एकदम खुसखुशीत, जबरदस्त आणि भन्नाट!!

 

©®सुवर्णा राहुल बागुल

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *