Khalgi Marathi Lekh

Potachi Khalgi

आज रविवार तसा सुट्टीचा निवांत दिवस पण सकाळी सकाळी धामणी गावात डफडे वाजायला लागले आणि विचार केला तर लक्षात आले की आज न कोणाचं लग्न न काही मग गावाच्या वेशीत हा आवाज कसला. हा आवाज होता आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावो गावी भटकंती करणाऱ्या डोंबारी समाजाच्या एका कुटुंबाचा.

 

लाकडाची फळी ,लोखंडी गज, एक एडका पाच लहान मूल,एक महिला आणि तीन पुरुष असा छोटासा परिवार होता. डफडयाचा आवाज आल्यावर सहाजिकच गावात गर्दी जमली. खेळ सुरू झाला. दोरीवरून चालणारी शांता नावाची महिला,त्यांची पाच मुलं ,पब्लिक खेळवून ठेवणारा नामाचा तो वजनदार भला मोठा आवाज.

 

ग्रामीण भागात तसं असले खेळ वारंवार येत असतात पण आज जरा वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली. आधी त्या दोन ते तीन वर्षांच्या लहान मुलांच्या दंड बैठका, नंतर त्या महिलेने गळ्याला लावून वाकवलेला गज, जमिनीवरून 5 फुटवरून उंच बाटली त्यावर एक फळी त्यावरून सादर केलेली ती नजाकत यानंतर त्याच फळीवर आपल्या कुटुंबातील लहान मुलं दोन कमरेवर एक खांद्यावर तर एक पायात पकडून केलेल्या सादरीकरणाला उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

 

पण त्यांना टाळ्या तर हव्या होत्याच पण त्याबरोबर हवं होतं ते पैसे ज्यावर त्यांची पोटाची खळगी भरणार होती. शांताने मैदानात फिरून पैशाची मागणी करत जेव्हा फिरली त्या वेळी बऱ्याच जणांनी आपल्या खिशात हात घालून कोणी दहा कोणी वीस तर कोणी पन्नास अशा नोटा त्यांच्या झोळीत टाकल्या तर काही मात्र एकमेकांच्या तोंडाकडे पाहत कोण किती टाकतो याची जणू मोजणी करताना पाहायला मिळाले.

 

समाजात वागत असतात आपण या समाजाचे काही तरी देणं लागतो या भावनेने का होईना पण त्या कलेला हे बक्षीस नक्कीच द्यायला पाहिजे. साधं आपण दुकानात जरी कोणी तरुण किंव्हा काम करण्यासारखं माणूस आले तर आपण म्हणतो की कष्ट करून खा तर मग ह्या दोन ते तीन वर्षांच्या मुलांना आणि त्या शांता नामा च्या कलेला. तर दोन रुपये का होईना देण्यासाठी किशात हात जाणं साहजिक होत. असो ज्याचा त्याचा तो प्रश्न असतो.

 

पण वाईट याच वाटत की आपला देश आपण महासत्ता होण्याकडे वाटचाल आहे असं म्हणतो मग ते कोणत्या आधारावर ? आजही आपल्याकडे एक वेळच्या जेवणासाठी एवढी मारामार कष्ट आणि जीव धोक्यात घालून या कला सादर कराव्या लागत असतील तर नक्की आपली दिशा कोणती…? हा प्रश्न तर अनुत्तरित राहतो. सरकार न देखील अशा लोकांसाठी काहीतरी ठोस पाऊल उचलले पाहिजे.

 

आपण देखील जेव्हा अश्या गोष्टी पाहायला मिळतील तेव्हा क्षणिक का होईना पण त्यांच्या पदरात दोन रुपयांची टाकलेली मदत ही त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य खिळवण्यासाठी पुरेशी असेल त्यांची रोजची पोटाची खळगी तरी निदान यातून ते भरू शकतील.
(आज घडलेली डोळ्यासमोरील सत्य परिस्थिती)

शब्दांकन:- मयूर सरडे

Liked it? Share with your friends...

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *