कामापूरता मामा

कामापूरता मामा असतो कामापूरता मामा
गरजेनंतर कोण ठेवतो आठवण तुमची सांगा

कुडकुडणाऱ्या थंडीत सूर्याची वाट पाहिली जाते
उन्हाळ्यात त्याच सूर्याला लाखोली वाहिली जाते
सूर्य वाईट ना थंडी उन्हाळा गरज महत्वाची बाबा
कामापूरता मामा असतो कामापूरता मामा

काम पडता आठवतात मग सगे सोयरे मित्र
वेळ संपल्यावरती तुला विचारत नाही कुत्रं
नमस्कार वाकून असतो जेव्हा ठरतो कुणी दादा
कामापूरता मामा असतो कामापूरता मामा

कधी नाही करत फोन,त्याचाही कॉल येईल
भेटत नसतो कधी कुणा, तो ही भेट घेईल
असला पाहिजे पैसा अडका अन थोडा गाजावाजा
कामापूरता मामा असतो कामापूरता मामा

गरज सरो अन वैद्य मरो अशी जगाची रीत
कुणी जगो वा मरो तिकडे, साधून घ्यावे हित
स्वार्थाच्या गाडीला नसतो मानवतेचा थांबा
कामापूरता मामा असतो कामापूरता मामा

© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajeshkhakre.blogspot.in

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *