Daam Kari Kaam Yedya

बारा डोळ्यांनी पापं सारी नारायण बगतो
पैशापायी माणूस मरतो, पैशावर जगतो

वासुदेवाची ऐका वाणी, जगात न्हाई राम रे
दाम करी काम येड्या दाम करी काम ।। धृ ।।

पैशाची जादू लई न्यारी, तान्या पोराला त्याची हाव
आई सोडून घेतंय्‌ झेप पैशाच्या मागुनी धावं
जल्मापासनं सारी मानसं ह्या पैशाची गुलाम रे
दाम करी काम येड्या दाम करी काम ।। १ ।।

कुनि जुगार सट्टेबाज, कुनि खेळं मुंबई मटका
चांडाळ चौकडी जमता, कुणी घेतो एकच घुटका
शर्यत घोडा चौखुर सुटला फेकला त्यानं लगाम रे
दाम करी काम येड्या दाम करी काम ।। २ ।।

ह्या कवडी दमडी पाई, कुणी रातीस घेई जीव
कुनी डाका दरोडा घाली, कुणी जाळून टाकी गाव
बगलंमंदी सुरी दुधारी, मुखी देवाचं नाम रे
दाम करी काम येड्या दाम करी काम ।। ३ ।।

नक्षत्रावानी पोरगी बापाच्या गळ्याला फास
ठरल्यालं लगीन मोडतं, हुंड्याला पैसा नसं
काळीज भरलं शिरिमंतीनं हातात नाही छदाम रे
दाम करी काम येड्या दाम करी काम ।। ४ ।।

वाड्यात पंगती बसल्या लई आग्रह जागोजाग
दारात भिकारी रडतो पोटात भुकंची आग
संसाराचं ओझं घेऊन कुणी टिपावा घाम रे
दाम करी काम येड्या दाम करी काम ।। ५ ।।

नाचते नारीची अब्रू छन छुन्‍नक तालावरती
पैशानं बायको खूश, पैशानं बोलती फिरती
ह्या पैशाच्या बादशहाला दुनिया करते सलाम रे
दाम करी काम येड्या दाम करी काम ।। ६ ।।


View All Marathi Folk Songs Lyrics

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *