असाच एक दिवस मनासारखा पार पडला
जरा कुठे टेकतो तोच देव उभा राहिला
म्हणाला केव्हापासून लक्ष्य आहे तुझ्यावर
फार मेहनत घेतोस तू तुझ्या कामावर
मी आज तुझ्यावर प्रसन्न झालो आहे
बोल काय आशीर्वाद हवा आहे
देवाला म्हटलो काय ते समजून देऊन टाक
देव म्हणाला, “वेड्या मनात असेल ते मागून टाक”
विचार करून सांगेन म्हटलो तर त्याला घाई होती
दुसऱ्या दिवशी बोलावून येईल याची खात्री नव्हती
विचार केला आणि म्हटलो एक “ब्लॅंक” आशीर्वाद दे
जेव्हा इच्छा होईल तेव्हा कॅश करायची सोय करून दे
तेव्हापासून खिशात एक कोरा आशीर्वाद घेऊन फिरतो आहे
सगळं व्यवस्थित दिलंय देवाने आणखी काय मागू विचार करत आहे