शिवजन्म

ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुघल बादशाहा शाहजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे. विजापूरच्या आदिलशाहाने ते बेचिराख करून टाकले होते. शहाजीराजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तिकडे विहीर! शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले. अशात जिजाबाई गरोदर होत्या , तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे , हा प्रश्न उभा राहिला.

 

शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील किल्ला. त्याच्या चारी बाजूंना उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. किल्ला मोठा मजबूत होता. विजयराज हे त्याचे किल्लेदार होते. ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले . . . . .

 

आणि तो सोन्याचा दिवस उजाडला . . . फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेब्रुवारी १६३०. शिवनेरीच्या नगारखान्यात सनई , चौघडा वाजत होता. अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. किल्ल्यावर आनंदीआनंद झाला. बाळाचे बारसे झाले शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव ‘ शिवाजी ‘ ठेवले.

 

शिवरायांचे बालपण : शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्षे फार धावपळीत गेली; पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या सांजवात लावत. शिवबांना जवळ घेत, मायेने कुरवाळत, त्यांना रामाच्या नि कृष्णाच्या, भीमाच्या नि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. तसेच कधी नामदेवांचे, कधी ज्ञानेश्वरांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत.

 

शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे. जिजाबाई साधुसंतांच्या चरित्रांतील गोष्टीही सांगत. त्यातन त्यांच्या ठिकाणी साधुसंतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधीकधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात. त्यांची कांदाभाकर आवडीने खात. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत. मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे! ती पोपट, कोकीळ, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत.

 

मातीचे हत्ती व घोडे बनवणे, मातीचे किल्ले सवंगड्यांसोबत रचणे हे त्यांचे छंद! लपंडाव, चेंडू, भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. शिवरायही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फारफार आवडायचे.

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *