बालपण: एक आनंददायी जीवनकाळ

बालपण का आयुष्याचा खूप सुंदर काळ असतो. ज्यावेळी एक जीव या पृथ्वीवर जन्म घेतो,त्यावेळी तो एकदम स्वच्छ,निरागस, निष्पाप असा जीव असतो.बालपण किंवा लहानपण हे खूप छान होते याची जाणीव मोठे झाल्यावर प्रत्येकाला होते.बालपणात एक सात्त्विकता असते.एखाद्या लहान मुलाकडे बघितले कि आपल्याला कसे प्रसन्न वाटते. त्याच्या चेहऱ्यावरुन एक चैतन्य ओसंडून वाहत असते. त्याच्या चेहऱ्यावर कायम हास्य झळकत असते. बालक कधी निराश, हतोत्साही, दमलेला दिसत नाही.तो कधी रडेलही पण रडगाणे गात बसणार नाही.

तो कायम काहीतरी करत असतो, कशात तरी रमलेला असतो. त्याच्या मनात कुणाविषयी द्वेषभावना किंवा वैर तो ठेवत नाही. त्याला उद्याची चिंता नसते. तो प्रत्येक क्षणात रमत जातो, त्याच्या खेळात गुंतत जातो. त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्यावाईट घटनांचा परिणाम त्याच्यावर होत नाही. त्याचे जीवन एखाद्या स्थितप्रज्ञासारखे असते. त्याच्या हास्यात एक निर्व्याजता असते. खोटेपणा नसतो, तो झोपतो तेव्हा शांत असतो, खेळतो तेव्हा उत्साही असतो, शिकतो तेव्हा जिज्ञासू असतो, हसतो तेव्हा प्रसन्न असतो, रडतो तेव्हा हट्टी असतो, तो प्रत्येकाला वेड लावतो.

बालपणी प्रत्येकाला मोठे व्हावेसे वाटते, त्याला विचारले की तुला काय व्हायचे आहे तर तो म्हणेल मला मोठे व्हायचे आहे. कधी वाटते माणसाने मोठे होऊन काय कमावले?   या जगात चालणारा गोंगाट, खोटेपणा, लाचारी, लुच्चेपणा यापैकी कशाचाही परिचय लहानपणी बालकाला नसतो.मात्र तो जसजसा मोठा होतो, त्याला आपल्या आजूबाजूला चालणाऱ्या गोष्टी बघायला मिळतात. तसतसा तो आपल्यात बदल करत जातो.

शाळेतली रांगेत चालण्याची शिस्त मोठेपणी सिग्नलवर नाहीशी होते. सत्य आणि प्रामाणिकतेचे धडे गिरवून मोठा झालेला मुलगा साहेब बणल्यावर भ्रष्टाचार करताना कचरत नाही.या सर्व गोष्टीला समाज म्हणून आपणच जबाबदार असतो.कारण शाळेत त्याला कितीही आदर्श गोष्टी शिकवल्या तरी जेव्हा तो एक नागरिक म्हणून या जगाच्या प्रांगणात पाऊल ठेवतो,त्यावेळी त्याला अनेक विरोधाभास दिसू लागतात आणि मग तो स्वतः च या सर्व गोष्टीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करता करता कधी येथील परिस्थितीचा एक भाग बनून जातो ते त्याचे त्यालाही समजत नाही.

कधी वाटते, आपण कितीजरी मोठे झालो तरी आपल्यात एक बालक कायम जिवंत असावा, तो बालक मरता कामा नये. आमच्यातला तो बालक जर मरून गेला तर तो सोबत त्या सर्वच गोष्टी घेऊन जाईल. आणि शिल्लक राहील नुसती चिंता, निरुत्साह, द्वेष, लालसा, जीवघेणी स्पर्धा, खोटेपणा, आणि लुच्चेगिरी. म्हणून असे वाटते की बालपण एक शुद्ध जीवन असते. कसली पर्वा नसते आणि कसली भीती नसते, कसला दिखावा नसतो अन कसली काळजी नसते. फक्त एक आनंदाचा झरा असतो, तो खळखळत असतो, आनंदाचा गुंजारव करत असतो, तो गुंजारव शाळेत रांगेत बसलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर दिसतो, कधी प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातासोबत जोडलेल्या हृदयात दिसतो, कधी बोबड्या बोलात दिसतो. वाळूत किल्ले बनविणाऱ्या हातात दिसतो, गल्लीत मुक्त बागडणाऱ्या पावलात दिसतो, सुरपारोंब्या खेळणाऱ्या झाडांच्या फांदीवर दिसतो.

त्या गुंजारवात मला माझे बालपण दिसू लागते. माझ्यातला बालक जागा होतो आणि मला बालपण खुणावू लागते.

-राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com

You May Also Like

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *