Ati Laghu Katha ALAK

अति लघु कथा

अलक.. १

आईच्या नावे असलेली जागा आपल्या नावावर करून घेण्याची सुप्त इच्छा मनात धरून आईच्या ताब्यासाठी दोन भाऊ भांडत होते. आईला विचारल्यावर ती म्हणाली जो माझ्या तीन औषधाच्या गोळ्यांची नावे एका झटक्यात सांगेल त्याच्याकड़े मी जाईन. दोन्ही भाऊ खजील झाले.

 

अलक.. २

शिक्षणासाठी दूर देशी गेलेल्या गरीब होतकरु मुलाने आईला पत्र पाठवले त्यात त्याने लिहिले, इथे माझी जेवणाची चंगळ आहे. काळजी करु नकोस. आईने ते पत्र वाचून एक वेळेचे जेवण सोडले कारण पत्राच्या शेवटी मुलाच्या अश्रुने शाई फुटली होती.

 

अलक.. ३

आजोबाच्या काठीला हाताने ओढत नेणाऱ्या नातीला पाहून लोक म्हणाले, अग हळू हळू आजोबा पडतील ना. आजोबा हसून म्हणाले, पड़ींन बरा, माझ्याजवळ दोन काठया असताना.

 

अलक.. ४

आंब्याच्या झाडावर चढून चोरुन आंबे काढणाऱ्या मुलांच्या पाठीत रखवाल दाराने काठी घातली आणि थोडा वेळ धाक म्हणून त्यांना झाडाला बांधून ठेवले. का कुणास ठाऊक पण त्यानंतर त्या झाडाला कधीच मोहर आला नाही.

 

अलक.. ५

ऑफीसातून दमून आल्यावर बाबाने आजीचे पाय चेपून दिल्याचे पाहून नातीने न सांगता बाबाच्या पाठीला तेल लावून दिल्याचे पाहून आजी म्हणाली, ताटातील वाटीत आणि वाटीतलं ताटात.

 

अलक.. ६

वडील गेल्यावर भावांनी संपत्तीची वाटणी केल्यावर म्हाता-या आईला आपल्या घरी नेताना बहीण म्हणाली, मी खुप भाग्यवान, माझ्या वाटयाला तर आयुष्य आलं.

 

अलक.. ७

काल माझा लेक मला म्हणाला बाबा मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही कारण तू पण आजी आजोबांना सोडून कधी राहिला नाहीस. मला एकदम वडिलोपार्जित प्रॉपर्टी नावावर झाल्यासारखे Feeling आले मला.

 

अलक.. ८

खूप दिवसांनी माहेरपणाला आलेली नणंद TV सिरीयल पहाता पहाता वहिनी ला म्हणाली वहिनी किती मायेने करता तुम्ही माझे , तर वहिनी म्हणाल्या अहो तुम्ही पण माहेरी समाधानाचे वैभव उपभोगायलाच येता की . सिरीयल मधल्या नणंदेसारखी आईचे कान भरून भांडणे कुठे लावता . मग मी तरी काय वेगळे करते. रिमोट ने TV केंव्हाच बंद केला होता.

 

अलक.. ९

तिच्या नवऱ्याचा मित्र भेटायला आला आज हॉस्पिटल मध्ये तो खूपच आजारी होता म्हणून. जाताना बळेबळेच ५००० चे पाकीट तिच्या हातात कोंबून गेला , म्हणाला लग्नात आहेर द्यायचाच राहिला होता , माझा दोस्त बरा झाला की छानसी साडी घ्या. त्या पाकिटा पुढे आज सारी प्रेझेंट्स फोल वाटली तिला.

 

अलक.. १०

आज भेळ खायची खूप इच्छा झाली तिला ऑफिस सुटल्यावर पण घरी जायला उशीर होईल आणि सासूबाईंना देवळात जायचे असते म्हणून मनातली इच्छा मारून धावतपळत घर गाठले तिने, स्वयंपाकघरात शिरली तर सासूबाई म्हणाल्या हातपाय धू पटकन भेळ केलीय आज कैरी घालून. खूप दिवस झाले मला खावीशी वाटत होती.

 

अलक.. ११

तिन्हीसांजेला सुमतीबाई देवापाशी जपमाळ घेऊन बसल्या होत्या. तेवढ्यात मुलगा कामावरून आला. पाठोपाठ मोगऱ्याचा सुवास आला. सूनबाईच्या केसात फुलला असेल या विचाराने त्यांनी अजूनच डोळे घट्ट मिटून घेतले. थोड्यावेळाने जप झाल्यावर डोळे उघडून पाहतात तर काय मोगऱ्याची ओंजळभर फुले त्यांच्या बालकृष्णासाठी ओटीत वाट पहात होती . त्यांची कूस अजूनही सुगंधीच होती. देवघरातला खोडकर कान्हा गालात हसत होता.

 

सकारात्मक अलक…

सध्या बाहेर इतके नकारात्मक विचार फैलावतायेत की लोकांचा माणसातल्या चांगुलपणावरचा विश्वास उडत चाललाय. अश्यावेळी अश्या सकारात्मक अलक ची आणि त्यांचा जास्तीत जास्त प्रसार करण्याची खरोखर आवश्यकता आहे. जगात सगळेच इतके वाईट नाहीयेत. चांगल्या माणसांची संख्या वाईटांपेक्षा खूप जास्त असल्यामुळे हे जग सुंदर झालं आहे.. 

Liked it? Share with your friends...

You May Also Like

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *