Aayushya Navache Kandepohe…

आयुष्य नावाचे कांदेपोहे..

काही दिवसांपूर्वी सहज आपलं घरी बसून कंटाळले आणि बाळ झाल्यापासून स्वतःसाठी असा वेळच मिळत नव्हता म्हणून नवरोबाला म्हंटल,दोन दिवस जरा फिरून येऊया, तर साहेबांच्या कामाचा व्याप एवढा की सणासुदीला पण सुट्टी नाही मग यावर्षी दिवळीही इकडेच.. गावीही नाही जमणार म्हणे जायला…

मग काय मी अजूनच नाराज झाले. तशीच विचार करत बसले होते तर बाजूच्या काकू म्हणाल्या आम्हीही इथेच आहोत दिवाळीला आणि आपण जाऊया फिरायला.. नवरोबाही म्हणे जा मग या मज्जा करून. शॉपिंग आणि फिरणे अशा दोन्ही गोष्टी कराव्या म्हणून निघालो ‘सपनो की नगरी,मुंबई’…

मुंबई आणि लोकल ट्रेन जशा “दिया और बाती” किंवा “सुई आणि धागा” इतका घनिष्ठ संबंध आहे दोघींचा!!! मग आम्हीही शनिवार रविवार बघूनच गेलो होतो जेणेकरून लोकलला गर्दी जरा कमी मिळेल.मुंबई दर्शन करत करत अवकाळी पावसाची मजा घेत आम्ही परत येण्यासाठी चर्चगेट स्टेशनला आलो.. दादरहून ट्रेन पकडणार होतो आम्ही परतीची..साधारणपणे वीस मिनिटांचा प्रवास होता चर्चगेट ते दादर. शनिवार असल्यामुळे आणि त्यात गाडीचं सुरुवातीचं स्टेशन असल्यामुळे फारशी गर्दीही नव्हती. आम्ही ट्रेन मध्ये चढलो..

ट्रेन निघायलाही दहा मिनिटे वेळ होता.आमच्या बाजूला तीन मुलींचा ग्रुप बसला होता. माझे बाळ त्यांच्याशी मस्त खेळायला लागलं म्हणून त्याही मस्त हसत होत्या त्याच्याशी. तेवढ्यात त्यातल्या एका मुलीच्या फोन वाजला.. समोरून आई असावी बहुतेक तिची.. पण ही मात्र जोरजोरात डाफरत होती तिच्यावर,”तुला समजत नाही का? मी आता ट्रेन मध्ये बसलेय, अजून निघाली पण नाही ट्रेन आणि पोहचायला मला अजून दोन तास लागतील,पाऊस पण किती चालू आहे, मी किती भिजून दमून निघाली आहे.. तुमचं नेहमीचंच आहे.. असं वाटतं घरीच येऊ नाही”!! एवढं बोलून तिने फोन ठेवून दिला.

मला ऐकायचं नव्हत पण ती इतकी जोरात बोलत होती की अर्ध्या लोकांना तर ऐकू गेलच असेल.विरार वसई कुठेतरी राहत असावी बहुधा एवढे दोन तास लागतात घरी पोहचायला म्हंटल्यावर. मला क्षणभर वाटलं कशी असतात आजकालची मुलं कशी बोलतात पटापट आईला, मग आठवलं मी पण अशीच चिडचिड करायचे आईवर लग्नाआधी.. खूप वाईट वाटलं स्वतःचाच राग आला. मनोमन आईची माफी मागितली.

पण मग त्यातल्या एका मुलीने तिला विचारले,”का गं काय झालं? आज परत शोभेची बाहुली बनायचं आहे वाटतं घरी जाऊन!” मला क्षणभर उलगडलंच नाही काय बोलताय त्या. मग हळूहळू समजलं की तिच्या आईने फोन वर सांगितलं की तिला बघायला पाहुणे येणार आहेत रात्री, तर घरी लवकर ये आणि तयार पण व्हावं लागेल येऊन… एव्हाना माझं बाळ त्यातल्या एकीच्या मांडीवर जाऊन बसलं होतं.. तेवढ्यात घोषणा झाली की ट्रेन पंधरा मिनिटं लेट निघेन कारण पावसाने ट्रकवर पाणी आल्यामुळे पुढच्या ट्रेन धीम्या गतीने सरकताय..

आता आम्हीही कंटाळलो होतो मग मीच त्या मुलींशी बोलायला सुरुवात केली. नोकरी करणारया होत्या त्या सगळ्या एकाच ऑफिस मध्ये. दिवसभर कामाचा थकवा आल्याने अगदी तो शीण त्यांच्या चेहरऱ्यांवर दिसत होता.. मीही मुंबईत राहिलिये आणि नोकरी केलीये सांगितल्यावर मग खुश झाल्या त्या.. गप्पा मारू लागल्या..

पण ‘वैदेही’ जीला बघायला पाहुणे येणार होते ती मात्र खूपच अस्वस्थ वाटत होती. आता अनोळखी व्यक्तीशी इतकं पर्सनल लगेच कसं बोलणार म्हणून मी माझ्या बाळाच्या बाललीला मध्ये तिला गुंतवून हसावण्याचा प्रयत्न करत होते तर ती म्हणाली, “किती बरं झालं असतो ना आपण लहानच असतो तर, कशाला मोठे होतो माहीत नाही? मग लग्न करावच लागलं नसत”.

मग त्या मुलीही तिला हो ला हो म्हणत होत्या. मी सगळं मनोबल एकटवून तिला म्हंटल “अंग का एवढी उदास होतीये? लग्न तर छान गोष्ट असते आणि मनाची तयारी नसेल तेव्हा त्रास होतो मान्य आहे मला पण चिडचिड करून तुलाच त्रास होतोय”! तर ती रडायलाच लागली. मला खूप अपराध्यासारखं वाटलं उगीच शहाणपणा केला बोलायचा. मी सॉरी बोलले तिला तर ती म्हणे,” नाही गं ताई,तुझ्या बोलण्यामुळे नाही मला मी मुलगी म्हणून का जन्माला आले याचा त्रास होतो म्हणून रडले”.बापरे ते ऐकून मला कसतरीच झालं..

मग त्यातली दुसरी तिची मैत्रीण मला सांगायला लागली, “अगं ताई,वैदेहीला बघायला येणार हा ४०-४२वा मुलगा असेल,तिची उंची जरा कमी आहे आणि सावळी आहे ती म्हणून नाकारतात मुलं.. बरं काही लोकांनी पसंत पण केलं तरी आबाच्यातोबा हुंडा मागतात, वर लग्नही धुमधडाक्यात करून मागतात, नवऱ्यामुलालाही सोनं घ्यायला सांगतात.. आणि घरचेही तयार होतं, कधीकधी अगदी जेमतेम पगार असलेले, तर कधी दिसायला खूपच खराब,कुणाला नावं ठेवण्याचा अधिकार नाही अपल्याला पण मागच्यावेळी आलेला मुलगा तर दोन मुलांचा बाप वाटेल एवढा जाड आणि वयस्कर वाटत होता..

ही एवढी नाजूक दिसायला मग ती जोडी तरी कशी दिसेल…तर कुणी वयाने दहा बारा वर्षे मोठा हिच्यापेक्षा..बरं मुलांच्या स्वतःच्या अपेक्षा अजून वेगळ्या, ” जॉब करणारी पाहिजे पण घरकामात एकदम सरस, कुणी म्हणे जॉब नाही करायचा, तर एक जण म्हणे गावी राहावं लागेल आईबाबाजवळ, मी येईन शनिवार रविवार घरी, एक जण म्हणे सगळा पगार माझ्या आईच्या हातात द्यावा लागेल, एक जण म्हणे एकत्र कुटुंब आहे तर तुला घरात रोज साडी नेसावी लागेल आणि कामावर पण साडीच नेसून जावी लागेल, अजून एक बहाद्दरने तर हद्दच केली बघायला आलेल्या कार्यक्रमात म्हणे लग्न झाल्यावरच एन्जॉय वगैरे ते फॅड नाही पाहिजे आम्हाला लगेच मूल पाहिजे, तो पण घराण्याला वारस असा त्याचा सूर होता.. अजून तर सांगायला गेलं तर रात्र संपेन”.

हे सगळं ऐकून मला तर धक्काच बसला.. मग वैदेही बोलू लागली, “मीही इंजिनियर आहे ताई, मला चांगला गलेलठ्ठ पगार आहे, आम्ही दोघी बहिणीच आहोत,भाऊ नाही मला,वडिल खूप कडक स्वभावाचे म्हणून कधी प्रेम वगैरे करायच्या भानगडीत पडलेच नाही मी..कितीतरी वेळा मोह झाला पण ती वाट आपली नाहीच म्हणून माघारी फिरले… आता स्थळ खूप येतात, पण माझ्या उंचीमुळे नाकारतात मला,रंगामुळे नाकारतात आणि विशेष म्हणजे मी जर एखाद्या मुलाला नापसंत केलं तर घरचे सुद्धा बोलतात की तू कोणती अप्सरा वाया चालली..

मान्य आहे मला माणसाने मन बघावं चेहरा नाही पण अगदीच अगडबंब मुलं जी माझ्या वडीलांसारखी दिसतात त्यांनाही नाही म्हणायचं नाही का? काहींचे स्वतःचे खायचे हाल होतील या मुंबईत एवढा कमी पगार असतो, तर घरचे म्हणतात दोघे मिळून कमावलं की होतं बरोबर आहे पण पुढे काही कारणास्तव मला जॉब सोडावा लागला तर काय? कसं जगणार एवढ्या तुटपुंज्या पगारात.. आणि पुढे जाऊन मी जास्त कमावते म्हणून त्याचा पुरुषी अहंकार जागला आणि यावरून भांडण झाली तर?? आपण कितीही म्हंटले तरी जगायला पैसे लागतातच..

मी इंजिनीअर असून माझ्यापेक्षा कमी शिकलेली पण मुलं पसंत करावी अशी आईची अपेक्षा.. मी माझ्या शिक्षणाचा माज करते असं बोलतात घरचे पण ताई तुम्हीच सांगा प्रत्येकाला अपेक्षा असते आपल्याला आपल्या अनुरूप नवरा मिळावा मग मी केली तर मी एवढी वाईट का ठरवली जाते.. आयुष्यभर तोही मला ऐकवणार मग की तू वरचढ आहेस म्हणून माज करते वगैरे..

मग माझं हे म्हणणं आहे की आई बाबा मुलीला एवढं शिकवतात कशासाठी, तिला स्वतःच्या पायावर उभं करतात, आकाशात गरूडभरारी घ्यायला शिकवतात मग एक दिवस अचानक असे पंख कापून घरात बसायला सांगतात.. मग कशासाठी हा खटाटोप.. बरं एवढं शिकवून हुंडा द्यायलाही तयार होतात, मग मीही अट ठेवली की हुंडा घेतला तर मी पगार घरात देणार नाही, माझ्या आईवडिलांना देईन तर लगेच रिजेक्ट केलं मुलाने मला.. आई वडीलही माझ्याच विरोधात त्यांना खरं तर काही गरज नाहीये माझ्या पैशांची पण हुंडा घेण्याऱ्याना उत्तर देणं गरजेचं आहेच.. म्हणून मी बोलून मोकळी होते..

बरं मी रोज दोन तास प्रवास करते एक बाजूने, मुलं बघायला येतात संध्याकाळी कारण माझी सुट्टी रविवार नाहीये आणि दरवेळी सुट्ट्या घेणं आता मला मान्य नाही.. खुप सुट्ट्या घेतल्या कांदेपोहेच्या कार्यक्रमासाठी.. सगळीकडे निराशाच पदरी पडली. एवढी थकून गेल्यावर साडीच नेसा पाहुण्यासाठी, एखाद्या दिवशी खूप कंटाळा येतो असं वाटतं जेवणही कुणी भरवलं तर बरं होईल तेव्हाही नटाथटा, शोभेची बाहुली बनून पाण्याचा तांब्या हातात घेऊन पाटावर बसा, सगळे खुर्चीवर बसून आपल्याला प्रश्न विचारणार..

मग मूलाशी बोलायला गेल्यावर तो कसा श्रेेेष्ठ,त्याचे आई बाबा कशे महान,त्याच्या अपेक्षा, त्याच्या आई बाबांंच्या अपेक्षा, त्याची स्वप्न.. सगळं ऐका.. आपलं काही सांगायला गेलं की तो फक्त होकार देणार, एखादा असतो समजूतदार पण घरच्यांसमोर काही चालत नाही मग मोठ्यांच्या गोष्टी ते ठरवतील असं सांगतात.. बरं हे झाल मुलांच्या बाबतीत त्यांचे आईवडील अजून भयंकर, एक बाई म्हणे जॉब करायचा तर कर पण घरी आलेला प्रत्येक पाहूणा खुश होऊन गेला पाहिजे, मोठा परिवार आहे तर ऑफिसच्या कामाचा परिणाम घरात नाही दिसला पाहिजे..

मला हेच समजत नाही स्त्रीच का स्त्रीचा पाय खेचते… सगळेच वाईट असतात असं काही नाही म्हणत मी पण माझ्या वाट्याला आलेले नव्वद टक्के स्थळ या मागासलेल्या विचारांपायीच नाकारले मी. घरात सगळे माझाच रागराग करतात.. आयुष्यच आता कांदेपोहे असल्यासारख वाटतंय… कधी कधी असं वाटतं कशाला जन्माला आले मी?”

एवढं बोलून ती गप्प झाली आणि शून्यात नजर खिळवून खिडकीतून बाहेर बघत होती. तिच्या बोलण्यात ट्रेन कधी सुरू झाली होती समजलं पण नाही मला. मी विचारात गुंग झाले आजही समाजाचा एक अविभाज्य घटक किती अन्याय सहन करतोय, तिची चूक तरी काय आहे देवाने तिला जशी बनवलीये तशी का कुणी स्वीकारत नाही.. इतकी हुशार असूनही सौंदर्य आणि जुन्या चालीरीती एवढ्या महत्वाच्या का वाटाव्या काही लोकांना??

तेवढ्यात माझे स्टेशन आले, आम्ही त्यांना बाय करून उतरलो आणि आमची ट्रेन पकडून घरी आलो.. पण माझ्या डोक्यातून आजही वैदेहीचा विचार आणि चेहरा जात नाही.. काय माहीत काय झालं असेल पुढे तिचं पण ही अगदी अलीकडची घटना आहे.. ८-१० दिवसापूर्वीची..

आता काही लोक लगेच मला विरोध करायला येतील की अस एवढं काही नाही आजकाल वगैरे.. पण त्यांना एवढंच सांगेन की आपल्या नशिबात नाही आलय म्हणून आपण नशीबवान आहोत या बाबतीत (मीही त्यातली एक नशीबवान) पण खुप मुली आजही हे सगळं सहन करताय..

आता प्रश्न आपण काय करू शकतो.. नक्कीच आपण तर आपल्या मुलांच्या लग्नाच्या वेळी या गोष्टी टाळूच पण आता जर आपल्या घरात, नात्यात असं कुठे होत असेल तर आपण थोडा प्रयत्न करूच शकतो हे थांबवण्याचा, आई बाबांना थोडा समजावण्याचा प्रयत्न करू शकतो.. मान्य आहे त्यांच्या अपेक्षा असतात पण त्यांना एक मर्यादा असावी आणि बहुतांशी लोक अर्ध्या गोष्टी लोक काय म्हणतील म्हणून करतात तर ती विचारसरणी बदलण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो.

सत्य घटनेवर आधारित!

©®सुवर्णा राहुल बागुल

Liked it? Share with your friends...

You May Also Like

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *