Aata Hawa Chotasa Break

आता हवा छोटासा ब्रेक

माझी आई आणि तिचा भयानक जीवन संघर्ष..आता ब्रेक हवाच!

“ए आई,आता बस झाल गं तुझं.. किती राबशील, सगळं आयुष्य पणाला लावलंस.. आता तू विश्रांती घे.. आता ब्रेक हवाच तुझ्या सुसाट सुटलेल्या गाडीला..”आमच्या आईला आमची ही विनंती आहे…

तर ही गोष्ट आहे माझ्या आईची!!

यात मी आहे, माझी भावंडं आहेत आणि खूप अडचणी, खूप संकटं आहेत पण एक “झाशीची राणी” आहे.. होय माझी आई.. कशी लढली ती वाचाच..

माझी आई, तिच्या आई वडिलांना एकुलती एक मुलगी.. घरची गर्भारश्रीमंती.. वडील नोट प्रिंटिंग प्रेस मधे कामाला. सगळं एकदम नीटनेटकं होतं पण दैवाला काही औरच मान्य होतं बहुधा. आईचे वडील खूप दारू पिऊ लागले आणि तिच्या आईला म्हणजे माझ्या आजीला मारझोड, शिवीगाळ रोजचाच तमाशा करू लागले. आईच्या दोन्ही काकांनी मोठ्या भावाला सावरण्याचा खूप प्रयत्न केला पण यश आलं नाही.. आजोबांनी दारूपायी सगळ्या संसाराचं वाटोळं केलं. आजीला सोडून गेले ते कितीतरी महिने परतलेच नाही आणि परतले तर घटस्फोट मागू लागले.

आईच्या दोन्ही काकांनी मनाचा मोठेपणा दाखवला, माझी आजी तेव्हा जेमतेम १९-२० वर्षाची असेल..त्यांनी घटस्फोट करवून घेतला का उगीच आपल्या अशा निष्काळजी भावासाठी लोकाच्या लेकराला अडकवून ठेवून तिच्या आयुष्याचं पोतेर करायचं म्हणून… आता प्रश्न होता की घटस्फोट झाल्यावर माझ्या आईला कुणाला सोपवणार? अगदी सिनेमा मधे दाखवतात तसं आईला कोर्ट मध्ये विचारण्यात आलं की तिला तिच्या आईसोबत राहायचे की वडिलांसोबत तर पाच वर्षाची माझी आई तेव्हा तिने कोण जाणे का वडिलांकडे जाण्याचा मार्ग निवडला.

माझ्या आईच्या काकांनी आजीचे तिच्या घरच्यांच्या संमतीने दुसरे लग्नही करून दिले. आजपासून ४५ वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे तर विचार करा किती प्रगल्भ विचारांचा मला वारसा मिळाला आहे. वडिलांकडे जरी गेली माझी आई तरी त्यांनी कधीच तिची जबाबदारी नीट घेतली नाही मग पुन्हा आईच्या काकांनीच तिचा सांभाळ केला. शिक्षण केलं.. दोन चुलत्यांच्या हाताखाली वाढलेली माझी आई कामात अगदी चपळ आणि तरबेज. शेण काढण्यापासून ते घरातला स्वयंपाक करून तिने दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. लग्नाआधीही फक्त काम आणि कामच तिच्या वाट्याला आले. तिने का कुणास ठाऊक (आजही ती आम्हाला सांगत नाही खरं कारण पण आता पस्तावते)पुढे शिक्षण घ्यायला नकार दिला आणि दोन वर्षाने तिच्या काकांनी माझ्या वडिलांशी तिचे लग्न लावून दिले.

माझ्या वडीलांकडची परीस्थिती खूप हलाखीची.. त्यावेळेला आईचे वडील आणि तिच्या दोन्ही काका यांचा प्रेस मधे खूप दबदबा होता. बऱ्याच तरुणांना त्यांनी तिथे कामाला लावलं होतं. माझ्या वडिलांनाही लावणार या बोलीवर लग्न ठरलं. ३६ वर्षांपूर्वी माझ्या आई वडिलांचं लग्न मोठ्या थाटामाटात संध्याकाळी पार पडलं. जरी काकांनी सांभाळ केला असला तरी त्यांनी कसलीच कमतरता ठेवली नाही. चार नणंद, एक दीर, सासू सासरे अशा कुटुंबात माझी आई येऊन पडली..

तिकडे लाडाकोडात वाढलेली माझी आई इथे चुलीवर स्वयंपाक करत होती, विहिरीतून पाणी ओढून आणत होती, चार खोल्यांच्या मोठ्या घरातून एक पडक्या सिंगल खोलीत एवढ्या माणसासोबत राहत होती. तेव्हा माझे वडील घरी थोडा हातभार म्हणून रिक्षा चालवत असे.. आणि नोकरीही शोधत होते. त्यांचं दुर्देव की माझ्या आईचं मला ठाऊक नाही पण प्रेस मधे त्यांच्यासोबत अर्ज केलेल्या सगळ्या लोकांची भरती झाली पण माझ्या वडिलांना नाही मिळाली नोकरी.

तिथून सुरू झाला तो माझ्या आईच्या आयुष्याचा सासुरवास.. सासूने छळ मांडायला सुरुवात केली. नणंदा होत्याच आगीत तेल ओतायला.. कधी कधी भांडण इतकी टोकाला जात की वडील आईवर हात उचलत असे आईच्या आणि बहिणीच्या बोलण्यात येऊन.. त्यात थोडा भावनिक आधार होता तो सासर्यांच्या म्हणजे माझ्या आजोबांचा आणि दिराचा म्हणजे माझ्या काकांचा.. आई निमूटपणे सगळं सहन करत राहिली. आईच्या काकांना हे सगळं समजल्यावर ते येऊन आईला घेऊन गेले, त्यांच्या विचाराने अन्याय सहन करणे चुकीचेच होते. त्यांनी आईला घटस्फोट घे म्हणून खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण आईला ते मान्य नव्हते.

असेच पाच वर्षे आई आणि पप्पा वेगळे राहिले..कुणीही घ्यायलाही आले नाही पण पप्पांना एव्हाना जाणवले होते की आपल्या आईचं ऐकत राहिलो तर आपला संसार मोडेन. आजीने बऱ्याच वेळा त्यांच्या दुसऱ्या लग्नाचाही प्रस्ताव मांडला पण त्यांनी तो फेटाळून लावला. एक दिवस अचानक आईच्या माहेरी बातमी आली, माझे आजोबाना(आईचे सासरे) पॅरालिसिस अटॅक आला आणि गेले.. आई धावतच घरी पोहचली.. यावेळी ती आली होती ती ठाम निर्णय घेऊन की आता माघारी जाणार नाही आणि अन्यायही सहन करणार नाही.

अशाच कुरबुरी रोज होत, काही दुर्लक्ष करून काही वेळेस उत्तर देऊन तर काही वेळेस सासूचा, नवऱ्याचा प्रसंगी नंदांचाही मार खाऊन तिने संसाराचा गाडा सुरूच ठेवला. अशातच बाळाची चाहूल लागली. वडिलांचे वागणे बऱ्यापैकी सुधारले होते पण आजीला देखवणार कसं ना? तिने तिच्या कुरापती चालूच ठेवल्या..पहिली मुलगी झाली.. आई, पप्पा, माझे काका सगळे आनंदी पण आजीच्या तोंडावर बारा वाजले. मग दुसरा, मग तिसरा नातूसाठी तिने आईचा छळ चालूच ठेवला.. आई सांगते त्यावेळी आपल्याला मूल हवं की नको हाही निर्णय बायका घेऊ शकत नव्हत्या.

आम्ही तिघी बहिणी झाल्यावर आईने ठरवलं आता बस.. एकतर तिने कधीच मुलगी मुलगी भेदभाव तिच्या घरात बघितलाच नव्हता आणि दुसरं म्हणजे आपली परिस्थिती एवढी जेमतेम आहे तर मुलांचं संगोपनही व्यवस्थित करता यावं म्हणून यावेळी ती खुप ठाम होती की आता मूल नकोच. तर पुन्हा आत्या आणि आजी एका बाजूला होऊन आईला एकटं पाडलं, पप्पा घरी नसताना घराच्या बाहेर काढून दिलं.. त्यात काकांना मुलगा झाला मग आजी लहान सून आणि मोठी सून असाही फरक करू लागली. आम्हा बहिणींना हातही लावत नसे पण चुलत भावाला खूप लाड करत असे.(हे सगळं मला आठवतंय हा व्यवस्थित).. आईला घटस्फोट च्या धमक्या देऊ लागली आजी आणि त्यावेळेला पप्पा आईच्या विरोधात एक शब्दही बोलू शकत नव्हते, बोलायला गेलं की ती आबाच्या तोबा तमाशा करायची..पप्पानाही मारायची.. आम्हा तिघीना घेऊन कुठे जाणार या भीतीने आईने पुन्हा एकदा सगळा अन्याय मान्य केला..

हुश्श!!! पुन्हा मुलगीच आता आम्ही चार बहिणी झालो.. आईने कामाला जायला सुरुवात केली शेतीत नंतर धुणी भांडी, केरकचरा जे काम मिळेल तिथे.. आम्हालाही वाटायला लागलं एक भाऊ पाहिजेच.. सहा वर्षानंतर एक भाऊ झालाच आम्हाला तेव्हा कुठे माझ्या आजीच्या तोंडाच्या गाडीला ब्रेक लागला. त्या बाळंतपणात आईची परिस्थिती खूप खराब झाली होती, मूल किंवा आई एकालाच वाचवता येईल सांगितल्यावर पप्पांच्या पायाखालची जमीन सरकली.. अंधकार उभा राहिला समोर.. पण सुदैवाने आई आणि भाऊ दोघेही बचावले त्यातून..

आता कुठे सगळं सुरळीत झालं होतं.. कष्ट करून पण सुखात जगत होतो आम्ही सगळे. स्वतःची स्तुती म्हणून नाही पण आम्ही सगळीच भावंड अभ्यासात हुशार निघालो. सरकारी शाळेत होतो पण आमचं रेकॉर्ड आहे सगळे आपापल्या दहावीच्या वर्षी शाळेचे टॉपर राहिलो आम्ही.

सगळं सुरळीत चालू होतं पण एके दिवशी अचानक नियतीने घाव घातला.. मी दहावीत, दीदी बारावीत आणि बाकी लहान बहिणी सातवी आठवीत भाऊ तर अगदी बालवाडीत होता.. सकाळी पप्पा झोपेतून उठलेच नाही..रात्री सगळे जेवून झोपलो ती काळरात्रच होती.. पुन्हा एकदा माझ्या मायमाऊलीच्या पायाखालची जमीन सरकली तिच्या डोक्यावरचं नवरा नावाचा आणि आमच्यावरून बाप नावाचं छत्र हरपलं..

पाच लेकरं आईच्या पदरात टाकून पप्पा गेले..कारण झाला हार्ट अटॅकचं..आजही तो दिवस आठवला तर पुन्हा एकदा पोरकं झाल्याची जाणीव होते. एखादी बाई खचली असती, निराश झाली असती पण माझी आई यातूनही उठली पुन्हा एकदा. महिनाभर दुःख केलं..लोक सहानुभूती दाखवून जात होते..नातेवाईक दशक्रियाविधी आटोपून गेले तर परत सहा सात वर्षे तोंड दाखवायला पण आले नाही. त्यावेळी आधार होता तो माझ्या काका काकूंचा.. खूप केलं त्या दोघांनी आमचं.. काकूने अगदी आई एवढंच जपलं आम्हाला..

महिना झाला बरोबर वडिलांना जाऊन आणि माझा दहावीचा निकाल लागला, केंद्रात पहिली आले मी पण आनंद नव्हता कुठेच. मी दुःखी होऊ नये म्हणून आईनेच तीच दुःख बाजूला ठेवलं माझ्या प्रत्येक सत्काराला, मुलाखतीला आई मला घेऊन जात असे. लोकांनी बरेच नाव ठेवले तिला पण तिला माहित होते तिला काय कारायचे आहे. पप्पांची खूप हौस की मुलींनी खूप शिकावं मोठं व्हावं..बस आईने निर्धार केला माझ्या जीवाचं रान करीन पण माझ्या मुलींना खूप मोठं करीन!!

काबाडकष्ट केले, दिवसरात्र मेहनत घेतली.. म्हणतात ना इच्छा तेथे मार्ग.. आमच्या शिक्षण घेण्याच्या जिद्दीकडे आणि माझ्या आईच्या हिम्मती पुढे त्या विधात्यालाही हार मानावी लागली..त्याने त्याचे देवदूत म्हणूनच पाठवले माझ्या प्रशांत पाटील सरांना.. त्यांनी माझा अकरावी बारावीचा खर्च उचलला.. माझ्यासाठी अकरावी बारावीचे क्लास चालू केले.. एकट्या माझ्यासाठी चालू केलेला तो क्लास आज नाशिकचा सुप्रसिद्ध आणि नामांकित क्लास आहे.

माझी बारावी पार पडली.. इंजिनीरिंयगला नंबर लागला.. माझ्यासोबतच्या मुलांना तीन तीन लाख डोनेशन देऊन लोक ऍडमिशन घेत होते, मी मात्र मेरिट मध्ये येऊन फक्त फी भरण्याची ऐपत नाही म्हणून रडत बसले होते..तेवढ्यात कुणीतरी घरी आलं.. ते गृहस्थ नेमकेच मुंबई वरून सुट्टी साठी नाशिकला आले होते.. त्यांची कामवाली बाई नव्हती, त्यामुळे ते आईला विचारत होते की आजच्या दिवस त्यांच घरकाम करून देता का?.. आई आणि मोठी बहीण गेल्या कामाला.. गुजराथी मंडळी होती ती.. आई तिथेही माझ्याच विचारात होती… तिचा नाराज चेहरा त्या गृहस्थाच्या बायकोने अचूक टिपला.. तिने आईला विचारलं काय झालंय, तर आधी आईने काही सांगितलं नाही पण त्यांनी खूप आग्रह केल्यावर आईने सगळं सांगितलं आणि काम आटोपुन घरी आली..

आई आल्यावर त्या नवरा बायकोचं काय बोलणं झालं माहीत नाही.. ते पुन्हा आमच्या घरी आले.. माझे मार्कशीट बघितले आणि अवाक झाले..त्यांनी कुणालातरी फोन लावला आणि काहीतरी गुजरातीत बोलले..आईने चहा पाणी केला तेवढ्यात पुन्हा त्यांचा फोन वाजला.. !! आणि ते आता आनंदी झाले . फक्त थँक यु एवढंच समजलं आम्हाला..नवी मुंबई स्थित “तारा एजुकेशन फाउंडेशन” नामक एका संस्थेचे ते ट्रस्टी होते. होय.. बरोबर ओळखलं तुम्ही..त्या संस्थेने माझ्या पुढच्या शिक्षणाचा सगळा खर्च उचलला होता!!! आईने अक्षरशः पाय धरले त्या जोडप्याचे…

अशेच देवदूत येत राहिले आणि आज आम्ही सगळी भावंडं उच्चशिक्षीत आहोत, ताई M. Com., मी Chemical Engineer with MBA, माझ्या पाठची बहीण M. Sc. Biotechnology, सगळ्यात लहान B. Sc. Microbiology आणि भाऊ Event manager (MBA)…

ही ताकद असते एका स्त्रीमधे.. नवरा गेल्यावर लोकांच्या फुटकळ धमक्या, केविलवाणे विचार यांना घाबरून आणि समाजाचा विचार करून तिने हार मानली असती तर??..लोक सांगायचे लग्न करून दे मुलींचे, कशाला पाहिजे शिक्षण एवढं, अक्षरशः घटस्फोटित, दोन मुलांचे बाप किंवा खूप गरीब अशी स्थळ ही आणली आमच्या हितचिंतकांनी आमच्यासाठी त्यावेळी..पण आईने हार मानली नाही..कुणाला दुखावलं ही नाही आणि तिला जे करायचे होते ते तिने करूनही दाखवले..आता येतात सगळे नातेवाईक कौतुक करायला तिचं.. त्यांनाही नाही दुखवत ती अजूनही.. सहनशीलतेचं मूर्तिमंत उदाहरण आहे माझी आई..

आता तिला या रहाटगाडग्यातून नक्की ब्रेक हवाच ना??

तुम्हाला काय वाटते?? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

©®सुवर्णा राहुल बागुल

Liked it? Share with your friends...

You May Also Like

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *