Padar – स्त्रीचा पदर

nauvari saree pallu

पदर काय जादुई शब्द आहे हो मराठीतला, काना नाही, मात्र नाही, वेलांटी नाही, अनुस्वार नाहि. सरळ तीन अक्षरी शब्द – पदर… पण केवढ विश्व सामावलेलं आहे त्यात.

किती अर्थ, किती महत्त्व … काय आहे हा पदर

साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या खांद्यावर रुळणारा मीटर दीड मीटर लांबीचा भाग … तो स्त्रीच्या लाज्जेच रक्षण तर करतोच. हेच सगळ्यात महत्त्वाचं काम आहे त्याचं, पण आणखीही बरीच कर्तव्य पार पाडत असतो.

या पदराचा उपयोग स्त्री केव्हा, कसा अन कशासाठी करेल ते सांगताच येत नाही.

सौंदर्य खुलवण्यासाठी सुंदरसा पदर असलेली साडी निवडते. सण – समारंभात तर छान – छान पदरांची जणू स्पर्धाच लागलेली असते. सगळ्या जणींमध्ये चर्चाही तीच.

लहान मुल आणि आईचा पदर हे अजब नातं आहे. मूल तान्ह असताना आईच्या पदराखाली जाऊन अमृत प्राशन करण्याचा हक्क बजावतं!

जरा मोठं झालं, वरण भात खाऊ लागलं की त्याचं तोंड पुसायला आई पटकन तिचा पदर पुढे करते.

मूल अजून मोठं झालं, शाळेत जाऊ लागलं की रस्त्यानं चालताना आईच्या पदराचाच आधार लागतो. एवढंच काय, जेवण झाल्यावर हात धुतला की टोवेल ऐवजी आईचा पदरच शोधतं आणि या गोष्टी आईलाही हव्या हव्याश्या वाटतात. मुलान पदराला नाक जरी पुसलं तरी ती रागवत नाहि.

त्याला बाबा जर रागावले, ओरडले तर मुलांना पटकन लपायला आईचा पदरच सापडतो.

महाराष्ट्रात तो डाव्या खांद्यावरून मागे सोडला जातो तर गुजरात, मध्य प्रदेशात उजव्या खांद्यावरून पुढं मोराच्या पिसाऱ्यासारखा फुलतो.
काही कुटुंबात मोठ्या माणसांचा मान राखण्यासाठी सुना पदराने चेहरा झाकून घेतात, तर काही आपला लटका राग दर्शवण्यासाठी मोठ्या फणकाऱ्याने पदरच झटकतात.

सौभग्यवतिची ओटी भरायची ती पदरातच अन संक्रांतीच वाण लुटायचं ते पदर लावूनच.

बाहेर जाताना उन्हाची दाहकता थांबवण्यासाठी पदरच डोक्यावर ओढला जातो तर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावरच छान उब मिळते.

काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी पदरालाच गाठ बांधली जाते. अन नव्या नवरीच्या जन्माची गाठ ही नवरीच्या पदरालाच नवरदेवाच्या उपरण्यासोबत बांधली जाते.

पदर हा शब्द किती अर्थांनी वापरला जातो ना ??

नवी नवरी नवऱ्याशी बोलताना पदराशी चाळे करते पण संसाराचा राडा दिसला की पदर कमरेला खोचून कामाला लागते.

देवापुढे आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना … माझ्या चुका पदरात घे म्हणून?

मुलगी मोठी झाली की आई तिला साडी नेसायला शिकवते, पदर सावरायला शिकवते अन म्हणते “अगं चालताना तू पडलीस तरी चालेल पण “पदर” पडू देऊ नकोस!” अशी आपली भारतीय संस्कृती.

आहो अशा सुसंस्कृत आणि सभ्य मुलींचा विनयभंग तर दूरच, ती रस्त्यावरून चालताना लोकं तिच्याकडे वर नजर करून साधे पाहणारही नाहीत. उलटे तिला वाट देण्यासाठी बाजूला सरकतील एवढी ताकद असते या “पदरात”

You May Also Like

5 thoughts on “Padar – स्त्रीचा पदर

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *